इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उदयपूरः राजस्थानमधील उदयपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. महामार्गावर कार आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला.
महामार्गाच्या चुकीच्या बाजूने तरुण कार घेऊन जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये पोलिस जमादाराच्या एका तरुण मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सुखेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेरीजवळ महामार्गावर हा अपघात झाला. देबारीच्या दिशेने चुकीच्या बाजूने जाणाऱ्या कारमध्ये पाच तरुण होते. ती समोरून येणाऱ्या डंपरला धडकली. सुखेर पोलिसांनी वाटसरूंच्या मदतीने घटनास्थळी पोहोचून कारमधील सर्व तरुणांना बाहेर काढले आणि एमबी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिस अधिकारी हिमांशू सिंह राजावत यांनी सांगितले, की देलवारा राजसमंद येथील रहिवासी हिम्मत खाटिक, पंकज नगरची, बेडला, उदयपूर येथील रहिवासी गोपाल नगरची, खारोल कॉलनी येथील रहिवासी गौरव जीनगर, सिसरमा आणि अन्य एकजण कारमधून प्रवास करत होते. ते आंबेरीहून देबारीच्या दिशेने चुकीच्या बाजूने जात असताना अचानक एक डंपर स्कोडा शोरूमसमोर आला. उतार असल्याने डंपर वेगात होता. डंपरच्या चालकाने कार वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र जागा न मिळाल्याने गाडीवर धडकली. या धडकेत कारच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे.