इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः अलिगडमधील टप्पल पीएस भागात काल रात्री उशिरा ट्रक आणि व्होल्वो बस यांच्यात भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत. बस दिल्लीहून आझमगडच्या दिशेने जात होती. याबाबतची माहिती समोर आली आहे.
अलीगढमधील टप्पल पोलिस ठाण्याच्या परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर काल (बुधवारी) रात्री ट्रक आणि बसमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १५ पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. यमुना एक्सप्रेस वेवर खासगी बसची ट्रकला धडक बसली. खासगी बस दिल्लीहून आझमगडला जात होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताबाबत माहिती देताना अलिगड पोलिसांनी सांगितले, की टप्पल पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचाव कार्य केले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
अलिगड दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बसेस कमी प्रमाणात असल्याने प्रवाशांना अनेक तास बसस्थानकावर ताटकळत रहावे लागले. अनेकांनी बस नसल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर दुसरीकडे रेल्वेला मोठी गर्दी उसळली होती.