नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात झालेल्या गुरूवारी (दि.१४) वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. त्यात एका मित्रासमेवत डबलसिट प्रवास करणा-या २५ वर्षीय परप्रांतीय तरूणाचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
राजूकुमार येधू चौधरी (२५ मुळ रा.अमरपूर जि.बाका उत्तरप्रदेश हल्ली जाधव संकुल अंबड) व दिपक मारूती निंबाळकर (४५ रा.तिरंगा चौक,कामगारनगर सातपूर) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. चौधरी गुरूवारी आपल्या मित्राच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कॅनोलरोडकडून दोघे मित्र गंगापूरच्या दिशेने जात असतांना कॅनोलरोड भागात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच २० बीटी ०९६० ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात चौधरी गंभीर जखमी झाला होता. मित्र सोनू मनोहर प्रसाद सिंग यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
दुसरा अपघात त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल भागात झाला. या अपघाात दिपक निंबाळकर या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. निंबाळकर गुरूवारी रात्री कामावरून दुचाकीवर आपल्या घरी जात असतांना हा अपघात झाला. नाशिक मर्चट बँकेसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ जीयू ०४५६ टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. मित्र तुषार दोंदे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.