नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवीच्या दर्शनाला जात असतांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा जवळ झालेल्या कार अपघातात नाशिकच्या उपनगर येथील तिघांचा मृत्यू झाला. यातील दोघे हे सख्खे भाऊ आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी आहे. चोपडा शहरापासून पाच किलोमीटरवर सूतगिरणीजवळ हा अपघात झाला. कारचे टायर फुटल्याने कार चोपडा – नाशिक शिवशाही बसवर जाऊन आदळली. त्यात जागीच तिघांचा मृत्यू झाला.
या अपघातात उपनगरचे श्रीरत्न मेडिकलचे संचालक शैलेश श्रीधर राणे (४०) , निलेश श्रीधर राणे (४२) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. तर इच्छामणी किरणा दुकानाचे संचालक जितेंद्र मुरलीधर भोकरे यांचाही मृत्यू झाला. तर त्यांचा एक मित्र ओंकार खोंड हा गंभीर जखमी आहे.
चोपडा येथील मनू देवीच्या दर्शनासाठी ते उपनगर येथून सोमवारी रात्री ११ वाजता ते कारने निघाले. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता ही घटना घडली. मयत आणि जखमी सर्व धुळे जिल्ह्यातील निजामपूरचे मूळ रहिवाशी असून सध्या नाशिक येथे राहत होते.