भरधाव कारची धडक; शतपावलीसाठी घराबाहेर पडलेले ५१ वर्षीय पादचारी ठार
नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने शतपावलीसाठी घराबाहेर पडलेले ५१ वर्षीय पादचारी ठार झाले. ही घटना जयभवानी रोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कारचालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. विकास नथू भिरूड (रा.इश्वर प्रसन्न अपा.सदगुरू नगर,अंधशाळा) असे अपघातात ठार झालेल्या पादचारीचे नाव आहे. विकास भिरूड हे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास मुलगा जतीन भिरूड (२०) यास सोबत घेवून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. दोघे बापलेक जयभवानी रोडवरील निसर्ग उपचार केंद्र परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. उपनगरकडून भरधाव येणा-या एमएच १५ ईई ०९०६ या कारने रस्त्याच्या कडेने चालणा-या विकास भिरूड यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात भिरूड गंभीर जखमी झाले होते. मुलगा जतीन याने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. जतीन भिरूड याने दिलेल्या तक्रारीवरून संबधीत कारवरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार परदेशी करीत आहेत.
…
भरधाव दुचाकी घसरल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी घसरल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात गोविंदनगर ते मुंबईनाका मार्गावरील नासर्डी पुल भागात झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अतुल ज्ञानेश्वर गायकवाड (रा.बडदेनगर,शिवाजी चौक अंबड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. गायकवाड बुधवारी (दि.१) दुपारच्या सुमारास महामार्गाच्या सर्व्हीस रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मुंबईनाका परिसरातील नासर्डी पूल भागात भरधाव दुचाकी घसरल्याने अतुल गायकवाड गंभीर जखमी झाला होता. पोलीसांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भिल करीत आहेत.