डांगसौंदाणे – डांगसौंदाणे- कळवण रस्त्यावर बुंधाटे गावा शेजारी आज दुपारी १ वाजेच्या दरम्यान दोघा दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, बुंधाटे येथील अनंत नंदूदास बैरागी (३२) हे आपल्या कळवण रोडवरील शेतात जाण्यासाठी दुचाकी (MH 41 AL 8417) ने निघाले असता शेतापासून हाकेच्या अंतरावर कळवण कडून येणाऱ्या दुचाकी (MH41 AV 3262)ची समरोसमोर धडक झाल्याने दुचाकी चालक अनंत नंदूदास बैरागी (३२ रा बुंधाटे) व किरण सुभाष सोनवणे (१८ रा. किकवारी बुद्रुक) यांचा या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. सर्वच जखमींना ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे येथे आणण्यात आले असता दोघांना मृत घोषीत करण्यात आले तर दोघा जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून एकाची प्रकुर्ती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाणे दिली आहे. याबाबत सटाणा पोलिसात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा तपास सटाणा पोलीस निरीक्षक सुहास अनमोलवर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार जयतसिंग सोळंकी, पोलीस शिपाई निवृत्ती भोये पंकज सोनवणे, सागर बेलुस्कर, निलेश पवार आदी तपास करत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की दोघा ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. अपघातातील तरुण अनंत बैरागी हा बुंधाटेचे उपसरपंच नंदूदास बैरागी यांचा मुलगा असून किकवारी येथील मृत तरुण आदिवासी गरीब कुटुंबातील असल्याने दोघा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.