नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. शिर्डीवरून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबईच्या साई भक्त्यांच्या गाडीचा हा अपघात सकाळी सात वाजेच्या सुमारास झाला. मुंबई येथील हे साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला आले होते. यावेळी ते दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना तवेरा कंपनीच्या एम एच ०४ क्यूझेड ९२२८ या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा वेग जोरात असल्याने गाडीने महामार्गावरून दीडशे फूट लांब वर पलटी घेतली. यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात मीरा-भाईंदर येथील इंद्रदेव मोरया (२८) आणि सत्येंद्र यादव (२७) यांना गंभीर मार लागल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर या वाहनातील आणखी सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या अगोदरही या महामार्गावर अनेक अपघात झाले आहे.