कोणार्क नगर भागात उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू
नाशिक : कोणार्क नगर भागात उड्डाणपूलावर उभ्या मालट्रक व चारचाकी वाहनात झालेल्या अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोरख बाबुलाल पवार (३३ रा.शिवदर्शन सोसा.लोखंडेमळा) असे मृत चालकाचे नाव आहे. पवार गुरूवारी (दि.२) रात्री ओझर कडून नाशिकच्या दिशेने आपल्या चारचाकीतून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. कोणार्क नगर भागातील उड्डाणपूलावर भरधाव चारचाकी उभ्या ट्रकवर आदळल्याने ते जखमी झाले होते. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक अहिरे करीत आहेत.
हिरावाडीत किरकोळ कारणातून कुरापत काढून दोघांनी एकास केली बेदम मारहाण
नाशिक : हिरावाडीत किरकोळ कारणातून कुरापत काढून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नितीन प्रकाश आंब्रे (४० रा.विजया सोसा.तांबोळीनगर,हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत जखमीच्या नाकाचे हाड मोडले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप गिरीधर झिंझर्डे व आकाश दिलीप झिंझर्डे (रा.दोघे जोशीवाडा,पंचवटी) अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे असून आंब्रे ५ मे रोजी दुपारच्या सुमारास हिरावाडी येथील मारूती मंदिर रिक्षा स्टॅण्ड येथे थांबलेले असतांना संशयितांनी त्यांना गाठले. यावेळी किरकोळ कारणातून वाद घालत संशयितांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत आंब्रे यांच्या नाकाचे हाड मोडले असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.
…….