भरधाव अज्ञात वाहनाने दिल्यामुळे अपघात; ६५ वर्षीय पादचारी जखमी
नाशिक :गंगापूररोडवरील बालाजी मंदिर भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय पादचारी जखमी झाल्याची घटना घडली. जेहिराम आवजी वाघमारे (६० मुळ रा.कपराडा जि.बलसाड हल्ली गंगापूरगाव) असे जखमी पादचारी वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात वाहनासह पसार झालेल्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे गेल्या सोमवारी (दि.२३) रात्री गंगापूर गावातून सोमेश्वर कडे पायी जात असतांना हा अपघात झाला. बालाजी मंदिराकडे जाणा-या वळणावर भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. अधिक तपास पोलिस नाईक चौधरी करीत आहेत.
उभ्या वाहनावर दुचाकी जावून आदळली
नाशिक : दिंडोरी रोडवरील करिलिव्ह हॉटेल समोर उभ्या वाहनावर दुचाकी जावून आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सचिन दत्तात्रेय वाघ व आकाश रमेश गिरी (रा.दोघे अश्वमेधनगर,पेठरोड) अशी जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत.या अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन वाघ याने तक्रार दाखल केली आहे. गेल्या मंगळवारी (दि.२४) रात्री दोघे मित्र एमएच १५ एफजे ६३९९ या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. दिंडोरीरोडवरील जकात नाक्याकडून दोघे म्हसरूळच्या दिशेने प्रवास करीत असतांना करिलिव्ह हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अज्ञात वाहनावर भरधाव दुचाकी जावून आदळली. चालक गिरी याचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.