नाशिक – नांदूर शिंगोटे शिवारात विवाहसमारंभ आटोपून घरी परतत असतांना दुचाकीस खासगी बसने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय महिला ठार झाली. कौसाबाई संतु बोडके (वय ६५ रा.वडझिरे ता. सिन्नर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नांदुर-शिंगोटे येथे नातेवाईकांचा विवाहसोहळा आटोपून वडझिरे येथील संतू बोडके त्यांच्या पत्नी कौसाबाई बोडके हे दाम्पत्य मोटरसायकल क्रमांक एम एच १५ बी एम ३९७७ नांदुर-शिंगोटे या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाहसोहळा आटोपून घरी जात असतांना बाह्यवळण रस्त्यावर खाजगी बस क्रमांक एम.एच. १७ ए.जी ६५६८ संगमनेरकडे जात असताना हा अपघात घडला. या अपघातात कौसाबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती संतु बोडके हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हौसाबाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा वडझिरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.