दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने चालकाचा मृत्यु
नाशिक : भरधाव दुचाकी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने चालकाचा मृत्यु झाला. हा अपघात लेखानगर भागातील उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर बाळासाहेब फटांगळे (३१ रा.ओझरमिग ता.निफाड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. फटांगळे गुरूवारी (दि.२६) रात्री पाथर्डी फाट्याकडून ओझरच्या दिशेने एमएच १५ जीके ७६६३ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव दुचाकी उड्डाणपुलावर भररस्त्यात उभ्या असलेला मालट्रक एमपी ६८ जी ०१७८ वर आदळली. हा अपघात बालभारती पाठ्यपुस्तक समोरील उड्डाणपुलावर झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या फटांगळे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अकरमखान इनामदार (रा.अशोकामार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक बैरामखान वलिन खान (रा.बºहाणपूर,मध्यप्रदेश) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकाने वाहतुकीस अडथळा होईल असे आपल्या ताब्यातील वाहन उभे केले. तसेच इंडीकेटर तथा कोणतेही प्रकारची प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने अपघात झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बेडवाल करीत आहेत.
फुलेनगरला कोयताधारी जेरबंद
नाशिक : परिसरात दहशत माजविण्यासाठी कोयता घेवून फिरणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. फुलेनगर भागात संशयीत दहशत माजवित होता. त्याच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश उर्फ बब्बू कैलास जुरडे (रा.गल्ली नं.३,अवधूतवाडी) असे संशयीताचे नाव आहे. जुरडे शुक्रवारी (दि.२७) रात्री फुलेनगर येथील मरीमाता मंदिर परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. पंचवटी पोलीसांनी तात्काळ धाव घेत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात धारदार कोयता मिळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.