मालट्रकने दिलेल्या धडकेत सात वर्षीय चिमुरडा ठार
नाशिक : भरधाव वेगातील मालट्रकने दिलेल्या धडकेत सात वर्षीय बालक ठार झाला. हा अपघात गंगापूररोडवरील खतीब डेअरी परिसरात झाला. सदर बालक काका काकू समवेत दुचाकीवर प्रवास करीत होता. अपघात इतका भयंकर होता की, कुटुंबिय दुचाकीवरून पडल्याने बालक मालट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने चिरडले गेले. या घटनेत मृत बालकाचे काका काकू जखमी झाले असून याप्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विघ्नेश जिवसिंग घोती (७) असे अपघातात ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रविण गोविंदसिंग घोती (रा.शुभलक्ष्मी कॉलनी,जायभावे नगर,पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. घोती दांम्पत्य बुधवारी (दि.१४) पुतण्या विघ्नेश यास सोबत घेवून दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. पुतण्यास दुचाकीच्या (एमएच १८ बीपी १९५६) पेट्रोल ट्रंकवर बसवून सायंकाळच्या सुमारास दांम्पत्य गंगापूररोडने आपल्या घराकडे परतण्यासाठी प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शगुन हॉल समोरूल खतीब डेअरी परिसरातून कुटुंबिय प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या युपी १८ डीटी ५२५१ या मालट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात घोती दांम्पत्यासह विघ्नेश दुचाकीवरून पडले. तर विघ्नेश ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच ठार झाला. या घटनेत घोती दांम्पत्यही जखमी झाले असून अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बैरागी करीत आहेत.
……….
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीच्या पहिल्या माळयावर एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर भागात उघडकीस आली. सदर इसमाची अद्याप ओळख पटली नसून त्याच्या आत्महत्येचे कारणही गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाम्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
हर्षल भटू मराठे (रा.खोडेमळा,सावतानगर) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यास माहिती कळविली. राजीवनगर येथील चड्डा पार्क या अर्धवट पडित इमारतीच्या पहिल्या माळयावर ही घटना उघडकीस आली. अज्ञात ३५ वर्षीय इसमाने पहिल्या माळ्यावरील दरवाजाच्या सिनेंटच्या कमानीला तारेच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. सदर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळून आला असून अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.
……….
अतिरक्तश्रावामुळे २८ वर्षीय विवाहीतेचा मृत्यू
नाशिक : बाळंतपणात अतिरक्तश्राव झाल्याने २८ वर्षीय विवाहीतेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर सिझरिंग शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. किरण ननके शर्मा (रा.हॅपी होम कॉलनी,बजरंगवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. किरण शर्मा यांना बाळंतपणासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सिझर शस्त्रकिया झाली होती. मात्र अतिरक्तश्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
………..
बाथरूममध्ये चक्कर येऊन मृत्यु
नाशिक : बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यु झाला. ही घटना सिडकोतील सिंहस्थनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाथोबा धोंडीबा ढगे (४९) असे मृत इसमाचे नाव आहे. ढगे बुधवारी (दि.१४) आंघोळीसाठी आपल्या घरातील बाथरूममध्ये गेले असता ही घटना घडली. अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. कुटुंबियांनी बेशुध्द अवस्थेत त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.