नाशिक – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) नाशिकमध्ये मोठा मासा गळाला लागला आहे. तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेताना नाशिक ग्रामीण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस उपनिरीक्षक महेश वामनराव शिंदे (३८) आणि संजय आझाद खराडे (वय ४५, रा. नाशिक) या एजंटला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आयपीएल सामन्यांचे बेटिंग सुरू असल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तब्बल ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम ३ लाख करण्याचे निश्चित झाले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. त्यात शिंदे आणि खराडे हे रंगेहाथ सापडले आहेत.
देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय. पी. एल. क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याबाबत तक्रारी सातत्याने येत होत्या. याप्रकरणी गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी, तसेच यापुढे आय.पी.एल. मॅच बेटिंगचा धंदा सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीचे पथक कसून चौकशी करीत आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा. त्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.