नाशिक – अंबड पोलिस स्टेशन येथे जामीनसाठी असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्विकारतांना पोलिस उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे व पोलिस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी हे लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. या दोघांना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना नाशिक न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर जामीनीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच मागण्यात आली. पण, तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर सापळा रचण्यात आला. या सापळ्यात लाच देतांना तडजोडी अंती ठरलेली १० हजार रुपये रक्कम अंबड पोलिस स्टेशन आवारात स्विकारतांना दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून यासंदर्भात १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन विभागाने केले आहे.