इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे सहा लाखाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले. कंत्राटदाराकडून १२ लाखाची मागणी मुख्याधिकारी यांनी केली होती. त्यातील ६ लाख रुपये स्विकारतांना ते रंगेहात पकडले गेले.
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. शासनाच्या नगर उत्थान योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे बिल दोन करोड काढण्याच्या मोबदल्यात ३ टक्के प्रमाणे ६ लाख रुपये मागितले. त्याचप्रमाणे राहिलेली उर्वरीत कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी ६ लाख रुपये असे १२ लाख रुपयाची चव्हाण यांनी लाच मागितली. त्यानंतर कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर साफळा रचून त्यांना रंगेहात पकडण्यात आले.