पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेतांना बुधवारी ससूनमधील बी. जे, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिकारी असलेल्या जयंत चौधरी व सुरेश बनवले यांना अटक केली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरावर छापेमारी सुरु करण्यात आली असून त्यात जयंत चौधरी यांच्याकडून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. तर सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही अधिका-यांकडे मोठे घबाड सापडल्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे.
महाविद्यालयातील फर्निचर पुरवठा करणा-या ठेकेदाराकडे त्यांनी लाच मागितली होती. दहा लाखांचे बिल काढण्यासाठी ही लाच मागितली. बुधवारी त्यांना पकडल्यानंतर त्यांनी जमा केलेली अपसंपदा शोधून काढण्याचे काम एसीबीने सुरु केले. दोन्ही अधिका-यांच्या घरावर छापेमारी करत मोठ्या प्रमाणावर रोकड आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. या अधिका-यांना आज न्यायालयातही हजर करण्यात येणार आहे.