जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू वाहतूक करण्यासाठी चार हजार रुपयाची लाच घेणारे पोलिस अंमलदार योगेश संतोष गोसावी व त्याला साथ देणारा होमगार्ड चंद्रकांत काशिनाथ कोळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. या दोघांविरुध्द अडावद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की , तक्रारदाराचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर असुन ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. सदर ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जर वाळू वाहतूक करायची असेल तर तुला दरमहा आमचे साहेबांना पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडे या दोघांनी पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम पोलिस अंमलदार योगेश संतोष गोसावी यांच्या सांगण्यावरून होमगार्ड चंद्रकांत काशिनाथ कोळी याला अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.