नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमळनेर येथे १२ हजाराची लाच घेतांना दोन कॅान्स्टेबल व एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकले. अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे अशी लाच घेणा-या पोलिस कॅान्स्टेबलची नावे असून या दोघांची नेमणूक अमळनेर पोलिस स्टेशन येथे आहे. या दोघांनी १५ हजाराची लाच मागितली व तडजोडीअंती खासगी व्यक्ती उमेश बारी यांच्यामार्फत स्विकारली. याचवेळी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने त्याला रंगेहात पकडले.
या लाच प्रकरणाबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडर मधुन कॉम्प्रेसर मशीनच्या सहायाने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. सदरचा व्यवसाय करत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे हे तक्रारदार व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी येऊन तक्रारदार यांना “तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५ हजार रुपये हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो असे सांगुन तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात येऊन समक्ष तकार दिली होती.
त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान पाटील व निकुंभे यांनी आरोपी उमेश बारी यांच्या हस्ते अमळनेर येथील बहादरपुर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये स्वराज्य पानाचे दुकानात तक्रारदार यांच्याकडुन १२ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले.