इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. सिनेट साठी ३ तर विद्यार्थी परिषदेच्या एकूण ४ पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार असून ७ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत ३ सिनेट सदस्य, १ अध्यक्ष, २ उपाध्यक्ष आणि १ सचिव आणि २ सहसचिव अशा ९ पदांवर निवडणूक होत असते. सह सचिव या पदासाठी एक जागा रिक्त राहिली असून, एका पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पॅनलद्वारे ही निवडणूक लढवली जाणार असून वैद्यकीय क्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी ७ पदांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अभाविपच्या माध्यमातून सिनेटच्या ३ पदांसाठी पियूष निंबाळकर (नाशिक), उत्तरेश्वर दराडे (धुळे), दिशा ताथेड (पुणे) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अध्यक्ष पदासाठी अभिजीत वाकचौरे (संगमनेर), उपाध्यक्ष पदासाठी सुजाता कांबळे (अंबेजोगाई) व माधव नरवाडे (बुलढाणा) आणि सचिव पदासाठी चैतन्य कावळे (संगमनेर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हे सिनेट व विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कटीबद्ध असणार आहेत. वैद्यकीय, नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतवैद्यकीय आणि पॅरामेडिकलच्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील समस्यांना वाचा फोडणे, महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय विचारांचे बीजारोपण करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच प्रवेश, परीक्षा आणि निकालांमध्ये होणारा विलंब टाळून सुसूत्रता आणणे असे या पॅनलचे प्रमुख उद्दिष्टे असणार आहेत. या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अधिकृत जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पॅनल चे समन्वयक म्हणून प्रणव साठे हे काम बघणार असून अभाविपचे सर्व कार्यकर्ते ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत.
“देशभरात होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये अभाविप ने नेहमीच आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, हीच परंपरा पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांकरीता काम करण्यासाठी हे पॅनल सज्ज झाले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अभविप चा निर्विवाद विजय निश्चित आहे. शैक्षणिक प्रश्न सोडविण्याचा वसा घेतलेल्या सर्व अभाविपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. सदर पत्रकार परिषदेस प्रदेश सह मंत्री ओम मालुंजकर व मेघा शिरगावे आणि प्रदेश मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.