मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगजेबाचे गोडवे गाणे विधानसभा सदस्य अबू आजमी यांना चांगलेच महागात पडले आहे. आज त्यांचे निलंबन कऱण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पण, त्यांच्यावर अर्थसंकल्पयीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. त्यांना विधान भवन परिसरात येण्यास बंदी असणार आहे. त्यांच्यावर निलंबन कारवाईचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात केली होती. दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाचा इतिहास, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा, पराक्रमाचा आहे. शंभूराजे हे महापराक्रमी तसेच उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा, असे त्यांनी सांगितले.