नवी दिल्ली – कोविड विषाणूचा नवा अवतार ओमिक्रॉनचा जगासह भारतात वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून देशात नव्या वर्षामध्ये नवे लसीकरण सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. तसेच वरिष्ठ नागरिक आणि फ्रंट लाइन वर्कर्सना अतिरिक्त प्रतिबंधात्मक डोस देण्याची घोषणा केली आहे.
इतर आजारांनी पीडित ६० वर्षांवरील नागरिक खबरदारी म्हणून कोरोना लशीची प्रतिबंधात्मक अतिरिक्त मात्रा (बूस्टर डोस) घेऊ शकणार आहेत. बूस्टर डोस घेण्यासाठी अशा नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असेल, अशी माहिती को-विन संचालनाचे प्रमुख आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांनी दिली.
एनआयए वृत्तसंस्थेशी बोलताना शर्मा म्हणाले, की ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे कोमॉर्बिक रुग्ण अतिरिक्त प्रतिबंधात्मक डोस घेण्यास पात्र असतील. अशा रुग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असेल. लसीकरणाची प्रक्रिया पूर्वीसारखीच असेल. कोविन अॅपवर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या वरिष्ठ नागरिकांनी कोमॉर्बिडिटी प्रमाणपत्र घेऊन नंतर तिसरा डोस घेण्यासाठी यावे लागणार आहे.
डॉ. शर्मा म्हणाले, या प्रमाणपत्रावर कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय अधिकार्याची स्वाक्षरी आवश्यक असेल. ते प्रमाणपत्र अॅपवर अपलोड करून लाभार्थ्यांनी याची हार्डकॉपी लसीकरण केंद्रावर घेऊन जावी. कोमॉर्बिडिटी प्रमाणपत्राचा तपशील आधीपासूनच उपलब्ध आहे. सुरुवातीला दुसर्या आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते. तोच फॉर्म्युला आता लागू होणार आहे. त्याच प्रमाणपत्राची आवश्यकता असेल.
कोमॉर्बिडिटीमध्ये २२ प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. त्यामध्ये मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयाचे आजार, मूळ पेशी (स्टेम सेल) प्रत्यारोपण, कर्करोग, सिरोसिस सारख्या आजारांचा समावेश आहे. अशा प्रकारच्या इतर आजारांच्या रुग्णांसाठी कोरोना विषाणूचा संसर्ग खूपच घातक सिद्ध झाला आहे.