विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात वेगाने फैलावणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात अमेरिकेची फायझर लस खूपच प्रभावी असून, ती १२ वर्षांवरील मुलांनाही दिली जाऊ शकते, असा दावा करून भारतात लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी फायझर कंपनीने केली आहे. भारतात प्रादुर्भाव झालेल्या एसआरएस-सीओवी-२ वेरिएंटविरोधात ही लस परिणामकारक ठरणार असून, एका महिन्यासाठी लस दोन ते आठ डिग्री तापमानात ठेवली जाऊ शकते, असे फायझर कंपनीकडून सांगण्यात आले.
जुलै ते ऑक्टोबरपर्यंत भारताला लशीचे पाच कोटी डोस देण्यासाठी कंपनी तयार आहे. परंतु लशीमुळे काही नुकसान किंवा साईड इफेक्ट झाल्यास भरपाई देण्यासह काही गोष्टींबाबत कंपनीने सवलत मागितली आहे. फायझरच्या अधिकार्यांनी विविध देशांकडून तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून फायझर लशीचे परीक्षण आणि आकडेवारी भारताच्या अधिकार्यांसमोर नुकतीच एका बैठकीत सादर केली आहे.
सध्या जगात आणि भारतात असामान्य परिस्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य परिस्थितीप्रमाणे केल्या जाणार्या प्रक्रिया आपण टाळल्या पाहिजे. ४४ देशांसह जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या परवानगीवर भारत सरकारने विश्वास ठेवला पाहिजे. भारताने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली पाहिजे. त्यानंतर भरपाईसारखे नियम लागू करू नये, असे फायझरच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.