मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठा बँकींग घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक बँकांचे शेअर्स कोसळले आहेत. एबीजी शिपयार्डचा घोटाळा तब्बल २२,८४२ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली. परिणामी, एबीजी शिपयार्ड कंपनीला कर्ज देणाऱ्या बँकांच्या शेअर्सवर प्रभाव झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये एबीजी शिपयार्डला कर्ज देणाऱ्या बँकांच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ६.६६ टक्क्यांची घसरण झाली. त्याशिवाय भारतीय स्टेट बँक (एसबीआय)च्या शेअर्समध्ये ५.२० टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) मध्ये ५.१७ टक्के, आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये ५.०४ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये ४.७३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. एबीजी शिपयार्डला कर्ज देणाऱ्यांमध्ये या प्रमुख बँकाचा समावेश आहे.
बँकिंग इंडेक्समध्येही घसरण
देशातील प्रमुख बँकांचे शेअर्स घसरल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई)च्या बँकिंग इंडेक्ससुद्धा ४ टक्क्यांहून अधिक कोसळले. बीएसईच्या खासगी बँक्स इंडेक्समध्ये ४.०१ टक्क्यांची घसरण होऊन तो १३,८९६.६६ अंकावर बंद झाला. बँक इंडेक्समध्ये ४.२५ टक्क्यांची घसरण होऊन तो ४२,२१५.८३ अंकावर बंद झाला. तर फायनान्स सेक्टर इंडेक्समध्ये ४.१९ टक्क्यांची घसरण होऊन तो ७,९४९.२६ अंकावर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले
बीएसई सेंसेक्समध्ये १७४७.०८ टक्के अंकाची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात ८.४७ लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले. ११ फेब्रुवारी रोजी सेंसेक्सचे बाजार भांडवल २६३.८९ लाख कोटी रुपये होते. ते सोमवारी १४ फेब्रुवारीला कोसळून २५५.४२ लाख कोटी झाले.
एबीजीला कोणी किती पैसे दिले
आयसीआयसीआय बँक – ७०८९ कोटी रुपये
आयडीबीआय बँक – ३६३९ कोटी रुपये
भारतीय स्टेट बँक – २९२५ कोटी रुपये
एक्झिम बँक – १३२७ कोटी रुपये
पंजाब नॅशनल बँक – १२४३ कोटी रुपये
इंडियन ओव्हरसीज बँक – १२२८ कोटी रुपये
बँकिंग क्षेत्रातील नुकसान
फेडरल बँक ६.७० टक्के
पीएनबी ६.६६ टक्के
बँक ऑफ बरोडा ६.४३ टक्के
आयडीएफसी फर्स्ट बँक ५.८१ टक्के
एयू स्मॉल फायनान्स बँक ५.३९ टक्के