मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात 15 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या पायाभूत सोयीसुविधा कक्षाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसंचालक विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक नितीन अंबावडकर आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, आयुष्मान भव मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम व ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत खासगी क्षेत्राचाही सहभाग घ्यावा.
केंद्र शासन आरोग्य विषयक विविध योजना राबवत असते. काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आपला सहभाग देते. अशा योजनांचे नियंत्रण केंद्र सरकारस्तरावर नियमितपणे होत असते त्यासाठी विविध पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवर केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची माहिती अद्ययावत भरावी. पोर्टलचे नियंत्रण व नियमितपणे कामाचा आढावा वरिष्ठस्तरावरून घेण्यात यावा, असे निर्देश मंत्री डॉ. पवार यांनी दिले.
भारताला क्षयरोग मुक्त बनवायचे आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावे. ज्या दिवशी भारत आंतरराष्ट्रीय उद्दिष्टापेक्षा पाच वर्षांपूर्वीच २०२५ मध्ये क्षयरोग मुक्त होईल तो दिवस आपणासाठी आनंदाचा असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी या कामाचा आढावा घेत असतात. आज जागतिक आरोग्य संघटना भारताच्या आरोग्य विषयक सुधारणांचे दाखले जगाला देत असते. हे सर्व ‘टीम वर्क ‘ मुळे होत आहे. प्रत्येकाने क्षयरोग मुक्त भारतासाठी ‘निक्षय मित्र’ मोहिमेत योगदान द्यावे.
बैठकीत मंत्री डॉ. पवार यांनी केले टेले कन्सल्टिंग, कॅन्सर डायग्नोसिस सुविधा, केमोथेरपी व रेडिओथेरपी सुविधा, सिकलसेल नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सोयीसुविधा विकास कामांचाही आढावा घेतला. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्ड वितरण गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्ताव, केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिलेल्या निधी व झालेला खर्च याबाबतही आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी बैठकीत सादरीकरण केले. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Aayushyaman Bhav Health Scheme Maharashtra Government