नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागांमार्फत आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढण्यासाठी पुढील 15 दिवस विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या ई-कार्डच्या माध्यमातून 1 हजार 209 आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होणार असल्याने नागरिकांनी मोफत ई-कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थ्यांना रुपये पाच लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. या योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारत चे पत्र, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे. त्याचप्रमाणे स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवून त्यावर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करतेवेळी देण्यात यावा, जेणे करून ई-कार्ड त्वरित तयार होऊन विनामुल्य उपलब्ध होईल. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे पैशांची मागणी केल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात तक्रार करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात 2011च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून या योजनेसाठी 16 लाख 7 हजार 144 लाभार्थी पात्र ठरले असून 23 सप्टेंबर, 2018 पासून आजपर्यंत साधारण चार लाख 90 हजार लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढले आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 3 लाख 71 हजार 727 लाभार्थ्यांनी ही योजना सुरू झाल्यापासून लाभ घेतला आहे. त्यासाठी रूपये 786 कोटी 14 लाख 21 हजार 708 इतका खर्च करण्यात आला आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आयुष्यमान भारत ई-कार्ड साठी नोंदणी करून मोफत ई-कार्ड काढावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात ‘आयुष्यमान भारत’ चे यश…
◼️ *_आजपासून 15 दिवस चालणार विशेष मोहीम_*
◼️ *_जिल्ह्यात 16 लाख 7 हजार 144 लाभार्थी पात्र_*
◼️ *_4 लाख 90 हजार लाभार्थ्यांनी घेतले गोल्डन कार्ड_*
◼️ *_3 लाख 71 हजार 727 लाभार्थ्यांनी घेतला लाभ_*
◼️ *_रूपये 786 कोटी 14 लाख 21 हजारांवर झाला खर्च_*
◼️ *_जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन करता येणार नोंदणी_*
◼️ *_1 हजार 209 आजारांवर करता येणार मोफत उपचार व शस्त्रक्रिया_*
Aayushyaman Bharat E Card Special Campaign Free Treatment