बिनतोड परिसंवाद आणि सर्वच कार्यक्रमांना दाद
- अजित चव्हाण
निसर्गाचं अनुपम सौंदर्य, निळाभोर समुद्र व भौगोलिक संपन्नता ही कोकणभूमीची वैशिष्ट्ये आहेतच पण बौद्धिकदृष्ट्याही कोकणाला नररत्नांची खाण असेच गौरविले जाते. कला,संस्कृती,ऐतिहासिक ठेवा, सांस्कृतिक ठेवा याचा संपन्नवारसा चिपळूणला फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे म्हणूनच केवळ रत्नागिरी जिल्ह्याचीच नव्हे तर कोकणची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून चिपळूणचा उल्लेख केला जातो. ज्येष्ठ कवी माधवापासून नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकरांपर्यंतची अनेक नवरत्न चिपळूण मधूनच उदयास आली.
या पार्श्वभूमीवर ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजन करण्याचा मान रत्नागिरी जिल्ह्यातील वाचन चळवळ जागवणाऱ्या चिपळूण मधील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला मिळणं हा एक दुग्ध शर्करा योग होता. दि.११,१२,१३ जानेवारी २०१३ रोजी साहित्य संमेलन चिपळूण मधील पवन तलाव मैदानातील यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत संपन्न झाले. तब्बल सोळा वर्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला साहित्यसंमेलनाच्या रूपाने दुसऱ्यांदा यजमानपद मिळाले. कोकणात ग्रंथालय चळवळीत अग्रेसर असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने यजमान पदाचे आव्हान लीलया पेलले. शारदेचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तमाम चिपळूणकरांनी खूप मेहनत घेतली .
साहित्य संमेलन म्हटले की टीका – टिप्पणी – वाद-विवाद अपेक्षित असते.पण हे वाद मंडपाबाहेर रंगले. भव्यदिव्य असणाऱ्या मंडपात मात्र साहित्यप्रेमींनी संमेलनाचा पुरेपूर आस्वाद लुटला. वादाचे पडसाद संमेलनपूर्व उमटत असतानाच संमेलनाची सांगता होईपर्यंत सर्व वाद निवळले. कोकणी जनता एकदिलाने संयोजकांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र या निमित्ताने दिसले.
संमेलनातील सर्वच परिसंवाद बिनतोड झाले. विदेशात मराठीचा जागर सतत घुमवण्यासाठी आम्ही सजग राहू अशी ग्वाही याच व्यासपीठावरून परदेशातील मराठी बांधवांनी दिली. तर नाट्य व चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलावंतांनी कोकणभूमीला लाभलेले सौंदर्य हा अनमोल ठेवा असून ही भूमी नाट्य व चित्रपट सृष्टीच्या दृष्टीने भविष्यात मोठी भूमिका बजावेल असे स्पष्ट केले. कथाकथन, कविसंमेलन, बाल जल्लोष हे सर्वच कार्यक्रम एकदम कमालीचे उत्तम ठरले.दहा हजार क्षमता असलेला सभामंडप भरगच्चपणे या सर्व कार्यक्रमांना दाद देत होता. संमेलनाला लोटणारी गर्दी एवढी होती की हे संमेलन खरेखुरे वैचारिक बैठक मांडणीचे नवे आयाम ठरले. पुस्तक प्रदर्शनातील खरेदीलाही अमाप प्रतिसाद लाभला.
नितीन देसाई यांनी कोकणची वैशिष्ट्य असणाऱ्या खेड्यांची केलेली उभारणी हे संमेलनाचे आकर्षण ठरले. गवताची घरे, विहिरी, शेतकरी व आदिवासी कोळी समाजाच्या राहणीमानाचे प्रतिबिंब या खेडेगावातून उमटत होते.संमेलनाच्या समारोपात संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपले मौलिक विचार मांडले. संमेलनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काव्यगायन,साहित्यिकांशी गप्पा-टप्पा, सांस्कृतिक मांदियाळी, पुस्तक खरेदी उत्साह, कविसंमेलन, कथाकथन व परिसवांदातील साहित्यिक विचारमंथन यामुळे हा शारदेचा सोहळा तमाम चिपळूणकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिला हे मात्र नक्की…..
(अजित गणपती चव्हाण, सहाय्यक शिक्षक, युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण. मो. ७५८८५७७०५१)
(संकलन – प्रा. लक्ष्मण महाडिक)