विजय जोशी, डोंबिवली
कविसंमेलन म्हटले की, अनेक गमती जमती होत असतात. मी बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गेलो होतो. निमंत्रितांचे कविसंमेलन अतिशय रंगात आले होते. निमंत्रितांच्या कविता संमेलनांमध्ये एका पाठोपाठ एक कवी आपली सुंदर रचना सादर करून जात होत. प्रेक्षकांच्या टाळ्या घेत होता . प्रेक्षकांमधून वन्स मोरची मागणी केली जात होती.
अशातच एक ज्येष्ठ कवीचे नाव पुकारले गेले. कवी महोदयांनी आपला स्वतःचा परिचय करून दिला. आपल्या कवितेची प्रस्तावना करू नये, असे सांगूनही कवीने प्रास्ताविक मनोगत सादर केले. कवी महोदयांनी माईकचा ताबा घेतला आणि आपली प्रदीर्घ अशी कविता वाचायला सुरुवात केली. कविता एवढी लांबलचक होती की, आता प्रेक्षक ,श्रोते हैराण झाले. कविता आता संपेल मग संपेल असे सर्वांना वाटत होते. परंतु, कवी काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. आणि माईक सोडण्याचा कवीचं इरादा दिसत नव्हता.
अशावेळी सूत्रसंचालकाची मोठी पंचाईत झाली.कवी महोदय निमंत्रित कवी असल्यामुळे हात धरून खाली बसवता येणे शक्य नव्हते. आता प्रेक्षक टाळ्या वाजवून कवितेला आणि कवीला टाळण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु कवी महोदय यांना असे वाटले की प्रेक्षक आपल्या कवितेला दादच देत आहे. आता संयोजकांची मोठी पंचाईत झाली. कवी आपली कविता सादर करण्यात दंग होते.
सूत्रसंचालकांनी स्वयंसेवकाकरवी चिठ्ठी लिहून पाठविली की “आता थांबा”परंतु कवी काही थांबेना. शेवटी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बांध सुटला .प्रेक्षक मोठमोठ्याने टाळ्या वाजवून “हिप हिप हु s s रे करू लागले. त्या त्या घोषणा आणि टाळ्यांचा अर्थ असा होता की ,”आता तुम्ही थांबा. ” परंतु कविला अधिक चेव येत होता. शेवटी निवेदकांनी त्याच्या माईकचा आवाज बंद केला.
विजेचा प्रॉब्लम समजून कवी आता मोठमोठ्याने कविता वाचू लागला. शेवटी सूत्रसंचालक आपल्या खुर्चीवरून उठून पुढे गेले. त्यांनी कवी महोदयांचा हात पकडून शेवटी खाली बसविले . तेव्हा कुठे कवी भानावर आला. आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अशा गमतीजमती साहित्य संमेलनामध्ये होत असतात.यातून सर्वीनी धडा घेतला पाहिजे, की प्रेक्षकांच्या,श्रोत्यांच्या सहनशीलतेला सीमा असतात. व्यासपीठावर कोणती कविता ऐकावी. याचे भान कवींनी ठेवणे गरजेचे असते. शेवटी कवी संमेलनाचं असं हसू झालं.