सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत.
वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी
पंढरपूर आषाढी वारी साठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.
वारी मार्गावर स्वच्छता
आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी होत आहेत. पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण वारी मार्गावर व पंढरपूर शहरात चांगली स्वच्छता ठेवावी. कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील अशी व्यवस्था करा. वारी मार्गावर फिरते शौचालय तसेच पंढरपूर शहरात शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये 24 तास ड्युटी लावून शौचालये स्वच्छ ठेवावीत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या, दैनंदिन साफसफाई यासाठी आजूबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
पाऊस व आरोग्य सुविधा
मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा. आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा. चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करावी.
पिण्याच्या पाण्याची सुविधा
पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा. तसेच आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.
यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा
खड्डे विरहित परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा. अस्वच्छ, दुर्गंधी जागा स्वच्छ करा. दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा.
संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. त्यांच्यासाठी सर्व त्या सोयी सुविधा द्या. पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा. कोणत्याही परिस्थितीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या. रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणांचा सहभाग घ्यावा.
वाहतूक व्यवस्था व वीज पुरवठा
सर्व मानाच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात पोलीस विभागाने योग्य वाहतूक व्यवस्था ठेवावी पालखी मार्गाच्या उलट दिशेने कोणत्याही परिस्थितीत वाहतूक व्यवस्था ठेवू नये.
वारकऱ्यांसाठी बसची संख्या वाढवा
आषाढी वारी च्या अनुषंगाने राज्य परिवहन विभागाने 4700 बसेसची व्यवस्था केली आहे, परंतु या वर्षी वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होणार असल्याने आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांनी बसेसची संख्येत वाढ करावी व भाविकांना प्रवासाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
समन्वय अधिकारी नेमणूक
अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले.
चंद्रभागेत स्नान व व्यवस्था
चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी. या ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.
वाढीव निधीची मागणी
जिल्हा प्रशासनाने आषाढी वारी च्या अनुषंगाने वारी मार्गावर पंढरपूर शहरात चांगल्या सोयी-सुविधा निर्माण केलेल्या दिसून येत आहेत. तरीही वारकऱ्यांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करावयाच्या असतील तर त्यासाठी नगर विकास विभागाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आराखडा
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकासाचा कायमस्वरूपी आराखडा होणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी देशातील तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायमस्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आषाढी वारी च्या अनुषंगाने विभाग स्तरावरून करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीदिली.तर जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी आषाढी वारी तयारी आणि नियोजनाबाबतची माहिती दिली. वारी यशस्वी करण्यासाठी वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पालखी मार्ग, पंढरपुरात पाण्याचे टँकर, गॅसची सुविधा देण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना यशदाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी मार्गात 70 मोटरसायकलवरील आरोग्यदूतांची नियुक्ती केली असून ते जिथे रूग्ण असेल तिथे जाऊन औषधोपचार करणार आहेत. वारी कालावधीमध्ये संपर्कासाठी वॉकीटॉकीची व्यवस्था, पंढरीची वारी हे ॲप तयार केले असून यातून वारकऱ्यांना सुविधांची माहिती देण्यात आली आहे. वारीसाठी 140 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून 26 सीसीटीव्ही हे मंदिर परिसरात बसविण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन, हिरकणी कक्षाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.
वारीच्या अनुषंगाने मंदिर व नगरप्रदक्षिणा मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. तसेच 10 माऊली स्क्वॉडद्वारे वारकऱ्यांना रांगेतून पुढे सरकण्यासाठी प्रेमाने विनवणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर कोणतीही घटना घडली तर त्वरित संपर्क होण्यासाठी 400 गॅमा कमांडो 100 दुचाकीसह नेमण्यात आले आहेत. त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. 9, 10 आणि 11 जुलै 2022 च्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यशदाचे प्रशिक्षण देण्यात आले. पालखी मार्गावर तीन ठिकाणी वॉच टॉवर टेहळणीसाठी राहणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री दादा भुसे यांनीही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याकडे विविध सूचना मांडून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
Aashadhi Wari Chief Minister Announcement Review Meeting