आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे, अशी मान्यता आहे.
आषाढी एकादशीचे व्रत केले जाते. ते करण्याची विशिष्ठ पद्धत आहे, ती अशी – आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.
एकादशीचे व्रत करण्याबाबत विविध मान्यता आहेत. त्यातील एक अशी, ‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे ! या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.’ असे गुरु परशराम पांडे महाराज सांगतात.
आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी असे समीकरण आहे. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. सप्तपुर्यांपेक्षाही थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर आहे.