इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील आशा सेविकांचा निवडणुकीचे काम करण्यास नकार दिला असून तसे निवेदन महापालिका प्रशासनाला दिले आहे. आशा सेविकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका विभागाअंतर्गत काम करणाऱ्या एनएचएम आणि बीएमसी आशा अत्यंत महत्वाची व अत्यावश्यक सेवा देत असून तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्याचे अत्यंत महत्वाचे काम त्या बीएमसी प्रशासनासाठी करतात. सध्या पावसाळा सुरू असून मुंबईत अनेक ठिकाणी साठलेले पावसाचे पाणी व तुंबलेल्या गटारी यांमुळे अतिसार, मलेरिया, डेंग्यु आदी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. एरवी देखील सर्व प्रकारचे आजार व रोग यांनी ग्रस्त रुग्ण शोधून काढून त्यांना आरोग्य केंद्रापर्यंत आणणे किंवा त्यांची माहिती आरोग्य केंद्राला देणे हे काम त्या करत असतात. विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण देखील त्यांना वेळोवेळी करावे लागते. आशांना रोज साधारणपणे ६ ते ७ तास काम करावे लागते व त्या त्यांच्या सर्व कामांमध्ये व्यस्त असतात. शिवाय त्यांना आपल्या कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्या आरोग्य सेवा व निवडणुकीचे काम ही दोन्ही कामे करू शकणार नाहीत. अशा वेळी निवडणुकीसारख्या नैमित्तिक कामामध्ये त्यांना गुंतवल्यास त्यांच्या आरोग्य सेवेच्या मूळ कामावर विपरीत परिणाम होऊन मुंबईत साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महत्त्वाच्या कारणांमुळे आशांनी निवडणुकीत बीएलओ म्हणून काम करण्यास नकार दिला आहे व तसे निवेदन पालिका प्रशासनाला दिले आहे.
या शिवाय आशांची मतदान स्तरीय अधिकारी- बीएसओ म्हणून केलेली नेमणूक कायद्याला धरून नाही. कायद्याच्या कलम १३ ब (२) नुसार बीएलओ शासकीय कर्मचारी, निमशासकीय अधिकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकृत अधिकारी असला पाहिजे. आशा या शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा बीएमसीच्या अधिकारी नाहीत. आशा या बीएमसीच्या कायम स्वरुपी कर्मचारी नसून आरोग्य सेवेच्या विशिष्ट कामासाठी नेमलेल्या व केलेल्या कामाच्या मोबदल्यावर काम करणाऱ्या कर्मचारी आहेत. त्या कंत्राटी किंवा मानधनी कर्मचारी देखील नाहीत. त्या अत्यंत गरजू असून त्यांच्या आशा म्हणून केलेल्या कामाच्या मोबदल्याची त्यांना गरज आहे. निवडणुकीचे काम व त्याचा मोबदला दोन्ही गोष्टींमध्ये नियमितता नाही. त्याचा मोबदला सुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आशा म्हणून मिळणारा मोबदला सोडून अशा कामासाठी वेळ देणे त्यांना परवडणार नाही. या सर्व कारणांमुळे त्यांना बीएलओ सहित कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीच्या संदर्भातील काम देण्यात येऊ नये व त्यांना त्यांच्या आरोग्य सेवेच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची मुभा द्यावी. सर्व आशांना बीएलओच्या आदेशपत्रामधून वगळण्यात यावे व ज्यांना आदेश दिले गेले आहेत ते रद्द करावेत असे त्यांनी पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हा सरचिटणीस आरमायटी इराणी यांनी ही माहिती दिली.