वंध्यत्व – अत्यार्तव
स्त्रियांमध्ये पाच दिवसापेक्षा अधिक काळ मासिक पाळीचा स्त्राव होणे अथवा अत्याधिक प्रमाणात पाळीचे अंगावर जाणे हे अत्यार्तवचे प्रमुख लक्षण असते. खूप वेळा अति प्रमाणात होणारा रक्तस्त्राव हा दुर्गंधीयुक्त असतो. रक्ताच्या गाठी पडणे, अंगदुखी ही लक्षणे असतात. अत्यार्तवाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत…

मो. 9822649544
अति प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शारीरिक थकवा, रक्त कमी होणे, चक्कर येणे, पर्यायाने मनोबल ढासळणे अशी लक्षणे आढळतात. मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या काळामध्ये अत्यार्तव लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसू शकतात. साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हा स्त्राव प्राकृत होतो. अशा या वयाच्या वळणावर या अवस्थेत मुलींच्या आहार, विहार यावर योग्य ते बदल कारावेत.
उत्तम आहार ठेवणे गरजेचे असते. दूध, तुप भरपूर असलेला सात्विक आहार घ्यावा. शतावरी कल्प नियमित घ्यायला हवे. विश्रांती घेण्यास सांगावे. तिखट, खारट, उष्ण तळलेले पदार्थ, फास्टफूड पूर्णपणे टाळावेत. पाळीच्या वेळी रक्तस्त्राव प्रमाण वाढल्यावर पायाखाली उशी ठेवून HEAD LOW पोझिशन द्यावी. अशा अवस्थेत विश्रांती घ्यावी. बराच वेळा गर्भाशयामध्ये गाठी (UTERINE FIBROID) यामुळे पण लक्षणे आढळतात. डिलिव्हरीनंतर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये गर्भाशयाचा आकार पूर्ववत होतो. परंतु काही कारणामुळे तसे न घडल्यास अधिकचा मासिक पाळीचा स्त्राव होतो.

काहीवेळा रजोनिवृत्ती (MENOPAUSE) या अवस्थेत सुद्धा अचानकपणे स्त्राव प्रमाण वाढते. हार्मोनचे असंतुलन (HORMONAL IMBALANCE) गर्भाशय गत विकृती, हार्मोन्स असंतुलन कॅन्सरची शक्यता या बाबी गृहीत धरून त्यानुसार उपचाराची दिशा ठरते. रक्तदाब वाढणे, मानसिक तणाव या कारणामुळे सुद्धा रक्तस्राव वाढल्याचे दिसतात.
रुग्णांमध्ये गर्भाशय मुखावर जखम असणे इत्यादी कारणांची तपासणी करणे योग्य ठरते. पाळीच्यास्त्रावचे प्रमाण व त्या सोबत असणारी लक्षणे याचा विचार करून प्रवाळ भस्म, कामदुधा रस, चंद्रप्रभा वटी, शतावरी कल्प, नागकेशर चूर्ण दुर्वांचा स्वरस, अशोकारिष्ट गरज पडल्यास शस्त्रकर्माने गर्भाशयनिर्हरन अशी चिकित्सा केली जाते.
योनी पिचू, योनीधावन, उत्तर बस्ती या स्थानिक चिकित्सा केल्यास तात्काळ फायदा होतो. पंचकर्मातील वमन, विरेचन असे उपक्रम करावेत. मानसिक तणाव अधिक असताना शिरोधारा, नस्य यासारखे उपक्रम लाभदायी असतात. कोणत्याही कारणाने अत्यार्तव होत असल्यास शारीरिक व मानसिक विश्रांती सोबत सात्विक आहार घेणे अत्यंत आवश्यक असते.









