विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनाच्या संकटात आर्थिक पिळवणूक होत असलेल्या सर्वसामान्यांसाठी ‘ऑपरेशन हॉस्पिटल’ हे अभियान राबविणारे आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे हे आता राज्यभर चर्चिले जात आहेत. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी ‘कपडे काढो’ आंदोलन केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमधील मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. नाशकातील केवळ काही हॉस्पिटल्समध्येच अयोग्य प्रकार घडतो, असेही यानिमित्ताने बोलले जात आहे. आणि त्याचीच दखल भावे यांनी घेतली आहे. डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) लाच भावे यांनी थेट खुले आव्हान दिले आहे. नाशिकमधील सर्व खासगी हॉस्पिटल्समध्ये १०० टक्के पारदर्शक कारभार चालतो, असे नाशिक आयएमएने जाहिर करावे आणि तसे सिद्धही करुन दाखवावे, असे आव्हान भावे यांनी दिले आहे. जर हे सिद्ध झाले तर तत्काळ ऑपरेशन हॉस्पिटल हे अभियान बंद केले जाईल, अशी घोषणा भावे यांनी केली आहे.
कपडे काढो आंदोलनानंतर आमच्याकडे आणखी मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्या सर्वाची आम्ही दखल घेत आहोत, असे भावे यांनी स्पष्ट केले आहे. यापुढील काळातही आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार आहोत. जिथे अन्याय होतो आहे, त्याला वाचा फोडली जाईल. जे आपारदर्शक काम आहे ते समाजासमोर आणले जाईल, असे भावे यांनी सांगितले आहे.