नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली महापालिकेत जोरदार यश मिळवित आम आदमी पक्षाने भाजपची १५ वर्षांची सत्ता घालवली आहे. तसेच, गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ५ आमदार विजयी झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नसला तरी पक्षाने आता हळूहळू मतदारांना आकर्षित करणे आणि मतदान मिळविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच आप आता राष्ट्री पक्ष झाला आहे. याचे परिणाम आता नजिकच्या काळात दिसणार आहेत. २०२३मध्ये तब्बल ९ राज्यांची विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालिम असेल. या निवडणुकीत आपची भूमिका काय असेल याचे तर्क आता लावले जात आहे.
आपने गुजरातमध्ये १२.९ टक्के मते मिळविली त्यामुळे काँग्रेसचा सर्वच हिशोब चुकला आहे. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४२.२ टक्के मतांसह ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र, केवळ २७.३ टक्के मते आणि १७ जागा मिळाल्या आहेत. आपमुळे इतरही अनेक राज्यात काँग्रेसचे गणित असेच बिघडू शकते. विशेष म्हणजे गुजरातमध्ये २७ वर्ष सत्तेत राहील्यानंतरही भाजप पुन्हा सत्तेत आली आहे. उलट काँग्रेसच्या अत्यंत कमी म्हणजे फक्त १७ जागाच निवडून आल्या आहेत. आता गुजरात निवडणुकीमुळे आप या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकात आप पूर्ण शक्तिनिशी उतरू शकते.
महत्त्वाचे म्हणजे दिल्ली मॉडेलचा दाखला देत ‘आप’ने यंदा मार्च महिन्यात पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागा जिंकून आणखी एक दणदणीत विजयाची नोंद केली आणि दोन राज्यांमध्ये सत्ता असलेला दुसरा पक्ष होण्याचा मान मिळविला. एवढेच नव्हे तर लांबणीवर टाकलेल्या दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत मोदी-शहांच्या चिवट भाजपला पुन्हा एकदा पराभव तडाखा दिला. त्यानंतर लगेचच गुजरातच्या निवडणुकीत सहा टक्के मतांची किमान पात्रता पार करीत आता ‘आप’ने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविला आहे. सन २०१५च्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत २८ जागा जिंकून काँग्रेसची अनेक वर्षांची सत्ता संपुष्टात आणल्याने राजकीय गणिते बदलली होती. याची पुनरावृत्ती करताना ‘आप’ने १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेत सत्तेत असलेल्या सर्वशक्तिमान भाजपची राजकीय शिकार केली आणि दिल्ली विधानसभेपाठोपाठ दिल्ली महापालिकाही ताब्यात घेतली.
दिल्ली मॉडेलच्या जोरावर ‘आप’ने २०२०च्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६३ जागा जिंकून मोदी-शहांच्या भाजपचा सलग दुसऱ्यांदा सफाया केला. आता भाजपला मत न देऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक मतदारांना काँग्रेसशिवाय नवीन पर्याय मिळू शकतो. त्यामुळे आगामी काही वर्षात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी भाजप व काँग्रेस नंतर तिसरा पर्याय ठरतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कमी अंतराने निकाल लागलेल्या जागांवर ‘आप’ चा डोळा आहे. त्यामुळे तेथील गणित आपमुळे बदलू शकते. आता या राज्यांमध्ये आप पक्षाला संधी असल्याचे बोलले जात आहे याला कारण म्हणजे सगळीकडे आम आदमी पार्टी हा दिल्ली विकासाचे मॉडेल मतदारांना दाखवत आहे इतकेच नव्हे तर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न या पक्षाचा दिसून येतो.
या उलट काँग्रेस पक्ष श्रेष्ठी मात्र नव्या उमेदवारांना ऐवजी आपले नेहमीचे उमेदवार उभे करताना दिसून येतात. त्यामुळे काँग्रेसपेक्षा अपाचीच आगामी काळात सरशी ठरणार असे म्हटले जात आहे. तसेच या राज्यांत आतापर्यंत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच नेहमीच मुख्य सामना होत आला आहे. तसेच बसपा तिसरा राष्ट्रीय पक्ष असला, तरी येथे त्याची शक्ती फारशी नसून प्रादेशिक पक्षही येथे मजबूत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आप पक्षाला अधिक संधी आहे, असे दिसून येते.
AAP National Party Upcoming Election Effects Politics