नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम आदमी पक्षाचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शिस्तप्रिय, स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी प्रसिद्ध आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा भावूक चेहरा पुढे आला असून यावेळी भाषण सुरू असताना ते रडल्याचा प्रकार घडला आहे. त्यांचे सहकारी मनीष सिसोदीया यांची आठवण काढत भावूक झालेले केजरीवाल याप्रसंगी स्वत:ला रोखू शकले नाही. मंचावर अचानक घडलेल्या या प्रकाराने उपस्थितांनाही धक्का बसला.
दिल्ली येथील बवाना परिसरामधील दरियापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान केजरीवाल अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले. केजरीवाल यावेळी इतके भावूक झाले होते की, त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांना खूप रडू येत होते. काही वेळ त्यांनी स्वत:ला रोखून धरले. त्यानंतर एका क्षणाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळलेत. यावेळी त्यांनी त्यांचे सहकारी तसेच दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांची आठवण काढली.
केजरीवाल म्हणाले,‘आपण सुरू केलेली ही शिक्षणाची क्रांती थांबावी असे त्यांना (भाजपा) वाटते. पण, आम्ही असे होऊ देणार नाही. मनीषजींनी याची सुरुवात केली होती. सर्व मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, अशी मनीष सिसोदियांची इच्छा होती. इतक्या चांगल्या माणसाला भाजपा सरकारने तुरुंगात टाकले आहे. ते उत्तम शाळा बांधत नसते किंवा शिक्षण व्यवस्था सुरळीत करत नसते तर ते आज तुरुंगात नसते.’ या भाषणादरम्यान केजरीवाल स्वत:ला रोखू शकले नाहीत. सिसोदीयांची आठवण काढत त्यांना रडू आले आणि त्या प्रकाराने उपस्थितदेखील भावूक झालेत.
मनीष सिसोदीया लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येतील. सत्याचा कधीच पराजय होत नाही, असे केजरीवाल भाषणादरम्यान म्हणाले.
AAP Delhi CM Arvind Kejriwal Emotional