नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या पक्षाने दिल्लीतून संपूर्ण देशात आपली पाळंमुळं रोवली, त्या काँग्रेस पक्षाचे आज दिल्ली विधानसभा व लोकसभा मतदारसंघांमध्ये शून्य अस्तित्व आहे. अश्यात काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळणारी अॉफर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे. आपने काँग्रेसला थेट दिल्ली सोडण्याचेच आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कितीही थट्टा केली, त्यांच्यावर देशभरातून विनोद होत असले तरीही आज देशाच्या राजधानीत त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. दिल्लीपाठोपाठ त्यांनी आता पंजाबवरही ताबा मिळवला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मात्र त्यांना सध्या चिंता आहे ती अध्यादेशाची. केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात बहूमत मिळविण्यासाठी आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या देशभरातील भाजपविरोधी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत.
भाजपविरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचा आघाडीवर आहे. आणि दिल्लीत आपने काँग्रेसचे नामोनिशान मिटवले आहे. अश्यात आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसला अॉफर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस दिल्ली आणि पंजाब सोडायला तयार असेल तर आम्ही राजस्थान आणि मध्यप्रदेश सोडायला तयार आहोत. या अॉफरने देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
पहिले थट्टाच केली ना
सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी आपची केलेली थट्टा आठवून दिली. आपने दिल्ली आणि पंजाबमध्ये वीज व पाणी मोफत देण्याचा निर्णय घेतला तेव्हा थट्टा करण्यात काँग्रेस आघाडीवर होते. नंतर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसने तेच धोरण अवलंबले, असे भारद्वाज म्हणाले.
ते स्वतःला राजा घोषित करतील
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील भाजपविरोधी पक्ष एकत्र आले नाहीत, तर २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून मोदीच शपथ घेतील. त्यानंतर देशात निवडणुकाच होणार नाहीत. आणि जीवंत असेपर्यंत ते स्वतःला भारताचा राजा घोषित करतील, अशी भिती भारद्वाज यांनी व्यक्त केली.