इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. अलीकडच्या काळात तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आणि दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. अशा आयाराम गयाराम यांची संख्या वाढल्याने नेमका कोण कोणत्या पक्षात? हे देखील कळेनासे झाले आहे. पक्षनिष्ठा नावाची काही गोष्ट असते हेच नेते आणि कार्यकर्ते विसरून गेले की काय असे म्हटले जात आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सुमारे सुमारे १५० नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. या काळात केवळ आपच नव्हे तर काँग्रेसलाही फटका बसला आहे. पक्षाच्या अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवसापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरून परतले असताना एवढ्या मोठ्या संख्येने आप नेत्यांनी पक्ष बदलला आहे. मार्चमध्येच ‘आप’च्या शेकडो नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिल्याचे बोलले जात आहे.
एका वृत्तानुसार, गुजरात भाजपचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मान हे घरी देखील पोहोचले नाहीत किंवा त्यांनी जेवणही घेतले नाही, तेवढया वेळेत त्यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये सामील झाले. यावरून ते गुजरातच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत हे स्पष्ट होते. त्यांच्या गुजरात दौऱ्याला काही अर्थ नाही. भाजपला गुजरातच्या जनतेचा आशीर्वाद आहे. पंजाबमध्ये आप सरकारच्या अवघ्या पाच दिवसांत शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला.
दरम्यान, नव्या नेत्यांचे पक्षात स्वागत करताना वाघेला म्हणाले, आज तुम्ही ‘आप’ आणि काँग्रेस सोडली. कारण तुमचा तेथे काही उपयोग नव्हता. पण, मी सांगू इच्छितो की, गुजरातच्या विकासासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात आणि भाजपमध्ये तुमचे स्वागत आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ भाजपचे सरकार आहे कारण जनतेचा आमच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.
दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात केजरीवाल आणि मान यांनी मोठ्या रोड शोमध्ये भाग घेतला. यासोबतच त्यांनी गांधी आश्रमात जाऊन चरखा फिरवण्यास सुरुवात केली. याशिवाय आपच्या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांसह अन्य नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर ते रविवारी गुजरातहून दिल्लीला निघाले होते. विशेष म्हणजे सोमवारीच गांधीनगर येथील कमलम कार्यालयात शेकडो आप सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.