इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आम आदमी पक्षा’च्या आतिशी सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. ‘आप’चा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.
गेहलोत यांनी पत्रात लिहिले आहे, की शिशमहलसारखे अनेक लाजिरवाणे आणि विचित्र वाद आहेत. सामान्य माणूस आता शंका घ्यायला लागला आहे. दिल्ली सरकार मुख्यमंत्री निवासावर सर्वाधिक खर्च करत असेल, तर केंद्राशी लढण्यात वेळ घालवला जात आहे. दिल्लीची खरी प्रगती होऊ शकत नाही. माझ्याकडे ‘आप’पासून फारकत घेण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
गेहलोत यांनी ‘आम आदमी पक्षा’वर आरोप करत म्हटले आहे, की ज्या प्रामाणिक राजकारणामुळे ते पक्षात आले होते ते आता होत नाही. केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान ‘शीशमहल’ असल्याचे सांगून त्यांनी अनेक आरोप केले. त्याचबरोबर यमुनेच्या वाढत्या प्रदूषणाबाबतही त्यांनी दिल्ली सरकारवर आरोप केले. आज आम आदमी पक्षाला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे आम्ही लोकांशी केलेली वचनबद्धता मागे पडली आहे.
आम्ही यमुना नदीचे स्वच्छ नदीत रूपांतर करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु ते कधीच करू शकलो नाही. आता यमुना नदी कदाचित पूर्वीपेक्षा जास्त प्रदूषित झाली आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढण्याऐवजी आपल्याला फक्त आपल्या राजकीय स्वार्थातच रस आहे. अजेंडासाठी दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्राशी लढण्यात घालवला, तर दिल्लीचा खरा विकास होऊ शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.