विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
काळी बुरशी आणि संभाव्य तिसरी कोरोना लाट याबाबत सोमवारी मोठा खुलासा झाला आहे. काळ्या बुरशीचा आजार हा संसर्गजन्य नाही त्यामुळे तो पसरण्याचा धोका असल्याचे कुठलेही वास्तव नाही, असे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, कोरोनाची तिसरी संभाव्य लाट ही लहान बालकांसाठी घातक असल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते. मात्र, त्यासंदर्भातील कुठल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाहीत, असेही डॉ. गुलेरिया यांंनी स्पष्ट केले आहे.
देशभरातील कोरोना स्थितीबाबत डॉ. गुलेरिया यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात अतिशय गंभीर वातावरण तयार केले. ऑक्सिजन आणि बेड अभावी शेकडो जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेविषयी सांगितले जात आहे. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये विशेष चिंतेचे वातावरण आहे. याचसंदर्भात डॉ. गुलेरिया यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग होईल, असे वाटत नाही. किंबहुना कोरोना संसर्ग बालकांना होण्याबाबतचे कुठलेही संकेत मिळताना दिसत नाहीत, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. या खुलाशामुळे देशभरातील पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://twitter.com/PTI_News/status/1396785537399222276
सद्यस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचे अनेक रुग्ण दाखल आहेत. अत्यंत जीवघेण्या या रोगामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भातही डॉ. गुलेरिया यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोना पश्चात होणारा काळ्या बुरशीचा आजार हा संसर्गजन्य नाही. त्यामुळे एकापासून अनेक व्यक्ती बाधित होत नाहीत. परिणामी, काळ्या बुरशीच्या आजाराबाबत फारसे घाबरुन जाण्यासारखे नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे. मधुमेह (डायबेटिस) असलेल्या व्यक्तींना काळ्या बुरशीच्या आजाराचा मोठा धोका आहे. तसेच, लवकर उपचार केल्यास रुग्ण नक्कीच बरा होतो, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1396784203782516741