नाशिक – अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफ्रॅक्चर्स असोसिएशन(आयमा) यांच्यावतीने १८ ते २१ मार्च दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित आयमा इंडेक्स २०२२ या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे.उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवार १८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होईल,अशी माहिती प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिंदाल सॉचे अध्यक्ष दिनेशचन्द्र सिंह,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील,ग्रीनबेस आणि हिरानंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.मैती आदी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात ३५५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्याद्वारे उद्योजकांना आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनाची माहिती एकाच छताखाली हजारो नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध होईल.गुंतवणुकीलाही यामुळे चालना मिळेल. नाशकात काही नवीन प्रकल्प येऊ घातले असून त्याची उद्दघोषणाही यावेळी करण्यात येण्याची शक्यता असल्याने हे उद्योग कोणते याची उत्सुकताही सर्वाना लागली आहे. दरम्यान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी आयमाचे विद्यमान अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,माजी अध्यक्ष वरुण तलवार,योगिता आहेर तसेच आयमाचे सर्व पदाधिकारी जीवाचे रान करीत आहेत, असेही बेळे यांनी सांगितले.