नाशिक – अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी भर दिवसा नंदकुमार आहेर या प्रतिथयश उद्योजकाची झालेली निर्घृण हत्त्या आणि गेल्या काही दिवसांकपासून गुन्हेगारीने वर काढलेले डोके या पार्श्वभूमीवर शहरतील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत विचारविनिमय करण्यासाठी सर्व व्यापारी तसेच उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक उद्या बुधवार ८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अंबड येथील अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन(आयमा)च्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून त्यास सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ आणि बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी केले.
गेल्या काही दिवसांपासून नाशकात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने उंचावत आहे ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.गेल्या पंधरवड्यात नाशकात 8 जणांची हत्या झाल्या.उद्योजक नंदकुमार आहेर यांची हत्त्या तर या सर्वांवर कळसच म्हणावा लागेल.या घटनेने उद्योजकांच्मध्ये घबराटीचे वातावरण आहे.दोन जूनपासून पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग सुरू केले असतांनाही हत्त्यासत्र थांबत नाही हे अतिशय गंभीर आहे असेच म्हणावे लागेल.त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांना अधिकाधिक सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी जोर धरू लागली असून त्या पार्श्वभूमीवर उद्या बुधवार (८ जून) रोजी होणाऱ्या बैठकीला विशेष महत्व असल्याचेही निखिल पांचाळ, धनंजय बेळे, सुधाकर देशमुख,प्रदीप पेशकार, विक्रम सारडा,विवेक कुलकर्णी, संदीप गोयल,यांनी सांगितले.