उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध – जिल्हाधिकारी
नाशिक- अंबड, सातपूरबरोबरच नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयमाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला त्यावेळी गंगाथरन डी. बोलत होते. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,बीओटी चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बूब, खजिनदार राजेंद्र कोठावदे, सचिव योगिता आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
नुकत्याच यशस्वी झालेल्या आयमा इंडेक्स २०२२ औद्योगिक प्रदर्शनाची माहिती धनंजय बेळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत दिली.नाशकात २०१० कोटींची गुंतवणूक आणण्यात आयमाच्या प्रतिनिधींना यश आल्याचे बेळे यांनी यावेळी निदर्शनास आणले. नाशिक-घोटी दरम्यान नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे काम तातडीने व्हावे आणि जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न व समस्या सोडवाव्यात,अशी गळ बेळे यांनी घातली. नाशकात औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित आहेत. त्याबाबतही बैठक घेऊन माहिती घेतल्यास व त्याच्या भूसंपादनासाठी आदेश दिल्यास व संबंधितांनी त्याकडे लक्ष पुरविल्यास ही जागा उद्योगवाढीसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी उपलब्ध होऊ शकेल.
तसेच नाशिकच्या चुंचाळे शिवारातील शासनाने पांजरापोळला दिलेली सुमारे १३०० एकर जागासुद्धा उद्योगांसाठी हवी आहे. ती उपलब्ध झाल्यास ती नाशिक शहराचा गेम चेंजर ठरेल. तरी त्या जागेबाबतही आपण एक बैठक लावल्यास व त्या जागेची संपादन प्रक्रिया सुरु केल्यास उद्योजकांना त्याची खूप मोठी मदत होईल असेही बेळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेच्या वेळी नमूद केले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आयमा प्रतिनिधींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यातबाबत शासनस्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे बैठकीत आश्वासन दिले. तसेच विविध सूचनांचा अभ्यास करून उद्योगवाढीसाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असे अभिवचनही दिले.