इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आपल्या वेगळ्या विषयांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतात. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही अशीच एक मालिका. या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. गेले काही महिने टीआरपीमध्ये ही मालिका सतत पहिल्या क्रमांकावर होती.
कुटुंबातील सदस्यांसाठी कायम उभी राहणारी मात्र स्वतःला काहीच अस्तित्व नसणारी अशी आई या मालिकेत दाखवण्यात आली होती. आता त्याच आईला आत्मभान येऊन तिने आपल्या कर्तृत्वावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या मालिकेने ८०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेची लेखिका मुग्धा गोडबोले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. लेखिका मुग्धा गोडबोले यांनी ‘८००!! सीमोल्लंघन’, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले या उत्तम अभिनेत्री आहेत. त्या मूळच्या पुण्याच्या असलेल्या मुग्धा गोडबोले या लेखिका मंगला गोडबोले यांच्या कन्या आहेत. राज्य नाट्यस्पर्धांमधून अभिनय करत त्यांनी पुढे ‘कळत नकळत’, ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या मालिकांमधून काम केले आहे.
दर्जेदार संवाद, घराघरात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब या मालिकेत दिसते. मालिकेतील कलाकारांचे अभिनय, संवाद यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. प्रेक्षकांकडून कायमच त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत असतं. ही मालिका दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७. ३० ला स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होते. तसेच डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील मालिकेचे भाग प्रदर्शित होतात.
आई कुठे काय करते’ या मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मधुराणी सोबतच या मालिकेत मिलिंद गवळी, अभिनेत्री अर्चना पाटकर, किशोर महाबोले असे दिग्गज कलाकार आहेत. विशेष म्हणजे या मालिकेचे हिंदी रूपांतरण करण्यात आले आहे. ‘अरुंधती’ या नावाने प्रसारित होणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री रूपा गांगुली मुख्य भूमिकेत आहे.
Aai Kuthe Kay Karte Serial 800 Episodes Completed
Marathi TV Serial Entertainment