नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॅन आधारशी जोडल्यानंतर आता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आधारला मतदारयादीशी जोडण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या माहितीच्या आशयाची अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली. याअंतर्गत मतदारयादी आधारशी जोडण्याशिवाय मतदारयादी लैंगिक निष्पक्ष बनविण्याची तसेच युवा मतदारांना एका वर्षात चार वेळा मतदारयादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
यासोबतच आता निवडणूक साहित्य साठविण्यासाठी आणि सुरक्षारक्षक तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मुक्कामासाठी कोणत्याही इमारतीची मागणी निवडणूक आयोगाला करता येणार आहे. संसदेने मंजूर केलेल्या निवडणूक संशोधन कायदा २०२१ अंतर्गत ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर माहिती दिली, की निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर यासंदर्भात चार अधिसूचना प्रसिद्ध केल्या आहेत. रिजिजू यांनी एक तक्ताही शेअर केला. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदारयादीत नाव नोंदविता येणार नाही. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या दिवशी मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहे.