नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या देशातील सर्व नागरिकांसाठी सध्याच्या काळात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कारण आधार नसेल तर अनेक ठिकाणी सरकारी दरबारी काम होणार नाही. इतकेच नाही तर आधार आणि इतर कागदपत्रावरील माहितीमध्ये साधर्म्य नसेल तरीही अडचण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी आधारमधील माहिती बदलणे किंवा अपडेट करणे गरजेचे असते.
आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच आपले जेंडर अपडेट करण्याचीही तरतूद आहे. आधारवरील माहिती अपडेट करण्याचे काही आहेत नियम आहेत. मात्र केंद्र सरकारने बनावट लाभार्थ्यांना योजनेच्या कक्षेतून वगळणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. यासाठी आधारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने सर्वच राज्यांना सरकारी कामात आधारची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे सरकारी पैशांचा अपव्यय थांबवता येईल. कारण सध्याच्या काळात आधार कार्ड यांच्या आधारित विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे, तसेच बँक पासबुक असो की अन्य कागदपत्रे हे देखील आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वोटर आयडी म्हणजे मतदान कार्ड देखील आता आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एका व्यक्तीकडे एकच मतदान ओळखपत्र राहणार असून, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त मतदान ओळखपत्र आहेत. त्यांची ओळख पटल्याने बनावट कार्डे नष्ट होण्यास मदत होणार आहे. सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार, राज्यांमधील सरकारी योजनांमध्ये आधार ऑथेंटिकेशनचा वापर वाढवण्यात येणार आहे. बनावट लाभार्थ्यांना योजनेच्या कक्षेतून वगळणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या कामात तेजी आणण्यासाठी युआयडीएआय राज्यांच्या कर्मचाऱ्यांना आधारशी निगडीत प्रशिक्षण देत आहे. या योजनेनुसार युआयडीएआय नागरिकांना १० वर्षांमध्ये एकदा आपले बायोमॅट्रिक अपडेट करणे, डेमोग्राफिक माहिती अपडेट करण्याची मुभा देणार आहे.
सध्या १५ वर्षांपेक्षा जास्त वयासाठी हा नियम नाही. तर सध्याच्या नियमानुसार ५ ते १५ वर्षांच्या मुलांनाच बायोमॅट्रिक अपडेट करण्याची परवानगी आहे. सुमारे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बाल आधार तयार केले जाते. यामध्ये त्यांचा फोटो असतो, तसेच आई-वडिल किंवा पालकांचे बायमेट्रिक डिटेल्स असतात. जेव्हा मुले १५ वर्षांचं होतं तेव्हा त्या मुलाचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट केले जातात. अशातच नाव आणि पत्ताही अपडेट केला जातो.
फिंगरप्रिंट आणि बुबुळ प्रमाणे आता तुमचा चेहरा देखील आधार कार्डची ओळख बनणार आहे. म्हणजेच, नागरिकांना त्यांच्या चेहऱ्यासह आधारचे प्रमाणीकरणही करता येणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. UIDAI ने त्याच्या अंमलबजावणीची तयारी पूर्ण केली आहे. लवकरच फेस ऑथेंटिकेशनच्या स्वरूपात तिसरा पर्याय आणणार आहे. सरकारची अन्न व पुरवठा, मनरेगा, शिक्षण, महिला कल्याण, कृषी आणि निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती आणि शेतकरी कल्याण यांसारख्या लाभार्थी योजना यांचा आधार कार्डनुसारच नागरीकांना फायदा मिळणार आहे.
आधार कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी युआयडीएआय त्याला लॉक करण्याचा सल्ला देते. या खास फीचरच्या माध्यमातून आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक केला जाऊ शकतो. यामुळे कार्डधारकाचे बायोमेट्रिक सुरक्षित राहतात आणि गोपनीयता कायम राहते. त्या व्यक्तीला हवे असल्यास ऑथेंटिकेशनच्या आधारे आधार लॉक किंवा अनलॉक करू शकते. आधार कार्ड धारकाला आपल्या जन्मतारखेत बदल करता येत नाही. फक्त आधार कार्ड बनवताना जन्म तारीख चुकली असेल तर इतर दस्तएवजाचा दाखला देऊन ती चूक दुरुस्त करता येते. अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डमध्ये आपली जन्मतारीख एकदा दुरुस्त करता येते.
आता ५ वर्षांहून अधिक वयोगटांची नवीन आधार नोंदणी दि. १ ऑक्टोबरपासून देशभरातील निवडक केंद्रांवरच केली जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने या संदर्भात सर्व सेवा प्रदाते, रजिस्ट्रार आणि एजन्सींना निवेदन जारी केले आहे. प्रौढ म्हणजेच १८ वर्षांवरील वयोगटाची आधार नोंदणी १०० टक्क्यां पेक्षा जास्त झाली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यूआयडीएआयने जारी केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्याचे सांगितले.
Aadhar Card UIDAI Big Changes After 10 Years