विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना साथीच्या रोगामुळे तसेच नागरिकांच्या दिरंगाईमुळे मागील वर्षापासून केंद्र सरकारच्या अनेक योजनांमध्ये आधार कार्ड जोडण्यात अडचणी येत आहेत. आता पॅनकार्डला आधार कार्डाशी जोडण्याची मुदत सरकारने आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. अद्यापही पॅनकार्ड मोठ्या प्रमाणावर आधारशी जोडले गेले नाहीत. म्हणजेच एक तृतीयांश पॅनकार्ड अद्याप आधार कार्डाशी जोडलेले नाहीत.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मे महिन्यापर्यंत सुमारे 38 कोटी पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले गेले होते. त्याच वेळी, १.२५ अब्जपेक्षा जास्त पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडले गेले नाहीत. तसेच या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण ५५ कोटी ८२ हजार पॅनकार्ड जारी करण्यात आली आहेत. यापैकी ५४ कोटी ६० हजार पॅनकार्ड स्वतंत्र व्यक्तींसाठी देण्यात आले आहेत. यातील २४ मे पर्यंत ३८ कोटी ३४ हजार पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर सुमारे १६ कोटी २५ हजार पॅनकार्ड जोडणे बाकी आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष अतुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, लोकांकडून दिलेली माहिती आधार कार्ड आणि पॅनकार्ड दोन्हीमध्ये एकसारखी नसल्यास लिंक करणे शक्य होत नाही. जेथे काही अडचणी उद्भवतात तेथे लिंक साधण्याची प्रक्रिया दुरुस्तीनंतरच केली जाईल. सदर ठरलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न झाल्यास ते अवैध ठरविले जाऊ शकते.
देशात कोरोना साथीच्या रोगामुळे काही काळापासून सरकारच्या योजनांमध्ये आधार कार्ड जोडण्यात अडचणी येत आहेत. कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आधारशी जोडण्याची तारीख वाढवावी, असे आवाहन या उद्योगाने या महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडे केले होते. यावर निर्णय घेत सरकारने सध्या ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आधारकार्ड आणि पॅनकार्डमध्येही अशा प्रकारच्या अडचणी पाहायला मिळत आहेत.