नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळच गुरुवारी सायंकाळी एका गर्भवतीची प्रसूती रिक्षात झाली. या गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. पण, तत्पूर्वीच तीची प्रसूती रिक्षात झाली. यावेळी आरोग्य कर्मचारी वेळीच धावून आले. पण, तत्पूर्वी महिला रिक्षातच प्रसूती झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून कर्मचा-यांनी नवजात बाळ आणि बाळंतीणी सुखरूप आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वनीता मनिष वाकडे (रा.जेलरोड) या गर्भवती महिलेस गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला जिल्हा रूग्णालयात हलविले. जेलरोड येथून रिक्षातून तिला सहा वाजेच्या सुमारास आणण्यात आले. मात्र, जेलरोड ते जिल्हा रुग्णालय प्रवासादरम्यान गर्भवतीस वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. सायंकाळी ६ वाजेदरम्यान रिक्षा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर आली. त्यावेळी तिला प्रसुतीवेदना असह्य झाल्या होत्या. रिक्षाचालकाने वेळीच आवाज दिल्याने आरोग्य कर्मचा-यांनी धाव घेतली मात्र तत्पुर्वीच वनिता यांची रिक्षातच प्रसूती झाली. कर्मचा-यांनी सोपस्कर पार पाडून महिलेसह बाळास उपचारार्थ दाखल केले. नवजात मुलीसह तिची आई सुखरूप असल्याचे रुग्णालयीन कर्मचा-यांनी सांगितल्याने वाकडे यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.