मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालकमंत्री दादा भुसे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी भाजपचे अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. याची एक प्रत भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुध्दा पाठवली आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. आता शिंदे गटातील मंत्र्याची भाजपच्या नेत्याने तक्रार केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप नेते अद्वय हिरे यांनी हे पत्र पाठवल्यामुळे त्याची चर्चाही जोरात सुरु आहे. हिरे – भुसे यांचा राजकीय वाद हा जुना आहे. पूर्वी दाभाडी विधानसभा मतदार संघ व आता मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात दोघेही निवडणुका एकमेकांविरुध्द लढतात. पण, आता दोन्ही नेत्यांचे पक्ष सत्तेत आहे. असे असतांना हिरे यांनी केलेली मागणी त्यामुळे चर्चेत आली आहे.