अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यात सात ते आठ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भदर ग्रामपंचायत मधील नवापूर येथील बाळू तुळशीराम गावित यांचे राहते घर भर पावसात कोसळल्याने भिंती, वासे, कौल यांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे लाकडाची झिज होऊन भिंती ओल्या झाल्याने दुपारच्या सुमारास घर कोसळल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने कुटुंब भात लागवडीसाठी मजूरीकरीता शेतात असल्याने बचावले. अन्यथा खुप मोठी दुर्घटना घडली असती. गावित कुटुंबाला आता रहायचे कोठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते. या घटनेची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात यांनी केली आहे.