नाशिक – प्रत्येक संकटामागे एक संधी दडलेली असते. ही म्हण डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिभावान डॉक्टरांच्या टीमने खरी करून दाखवली. नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका पाच वर्षाच्या मुलाला अंधकारमय भविष्यावर मात करत प्रकाश पाहण्यासाठी मदत केली.
ही केस एका पाच वर्षांच्या मुलाची आहे. (मुलाचे नाव- इयाज शेख) त्याला अनेक तक्रारींसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १४ किलोग्रॅम वजन असलेल्या पाच वर्षांच्या मुलाची नखे आणि जीभ यांचा रंग निळसर झाला होता. रक्तातील प्राणवायूची पातळी जवळजवळ ६८ टक्के होती. 2डी – ईको तपासणीदरम्यान ‘फॅलॉट टेट्रोलॉजी ‘ असल्याचे निदान झाले. हृदयातील दोन मोठ्या कप्प्यांच्या मधील पडद्यात मोठे छिद्र दिसून आले. (VSD). फुफ्फुसाकडे रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी निमुळती झाली होती. डाव्या फुफ्फुसात रक्ताभिसरणाची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. यामुळे हे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचे झाले.
तेव्हा डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखालील कुशल डॉक्टरांच्या टीमने ओपन हार्ट सर्जरी आणि ‘intra कार्डियाक रिपेअर’ करण्याचा निर्णय घेतला. हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य हे शरीराबाहेर दुसर्या मशीनवर करण्यात आले. या दरम्यान हृदय पूर्णपणे बंद करून त्यावर ऑपरेशन करण्यात आले. हृदयातील छिद्र डॅक्रॉन पॅचने बंद करण्यात आले. डाव्या फुफ्फुसाची धमनी (लेफ्ट पल्मनरी आर्टरी- एलपीए) ही सुरवातीपासून फुफ्फुसापर्यंत उघडून आणि पेरीकार्डियल पॅच लावून वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे फुफ्फुसाच्या मुख्य रक्तवाहिनीचा आकार वाढवून त्यात नवीन झडप तयार करण्यात आली.
याविषयी,डॉ. वर्षा कुलकर्णी (ज्येष्ठ भूलतज्ञ) म्हणाल्या, “ अशा लहान निळ्या मुलाला भूल देणे आणि शस्त्रक्रियेनंतर हृदयाचे कार्य सामान्य करणे, आव्हानात्मक असते. डॉक्टरांच्या समर्पित आणि प्रतिभावान टीमने ऑपरेशन नंतरच्या आयसीयु आणि व्हेंटिलेटर व्यवस्थापनात आम्हाला मदत केली. त्यानंतर हृदय पुन्हा सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी करण्यात आले होते, ते सामान्य स्थितीत आणण्यात आले आणि मशीनचे काम पुन्हा हृदय आणि फुफ्फुसांवर सोपविण्यात आले. ऑपरेशननंतर रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर विशेष डॉक्टरांच्या एका खास समर्पित टीमने रुग्णाच्या मुख्य पॅरामीटर्सचे बारकाईने निरीक्षण केले.
डॉक्टरांच्या टीमच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आणि डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्व व कौशल्यामुळे हे बालक काही तासांतच शुद्धीवर आले. ऑपरेशननंतर कोणताही रक्तस्त्राव किंवा रक्त कमी न होता त्याच्या सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स व्यवस्थित होते. आज या चिमुकल्याच्या हृदयातील दोष पूर्णपणे सुधारला आहे आणि त्याची ऑक्सिजनची पातळी ९६ टक्के वर कायम आहे. इतकंच नाही, तर हा छोटू आता शाळेतही जाऊ लागला आहे.