मुंबई ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – विदर्भ – मराठवाड्यासह राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. मराठवाड्यातील शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आता खरीप हंगाम गेला आहे. पुढे रब्बी हंगाम येईल. अतिवृष्टी भागातील काही ठिकाणी पंचनामे केलेले नाही. या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळायला हवी तिथे ती मिळालेली नाही. मात्र काही ठिकाणी मनुष्यहानी झाली तिथे ४ लाखाची मदत मिळाली आहे. परंतु ती मदत तुटपुंजी आहे त्यात वाढ व्हायला हवी. पशुधनाची भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ मिळायला हवी. अतिवृष्टी भागातील घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभे करण्याचे आव्हान नागरिकांसमोर आहे त्याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष द्यायला हवे अशी मागणी आज केली
*यावेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यासह, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,माजी मंत्री हसन मुश्रीफ, आ. अनिल पाटील, आ. सुनील भुसारा, आ. नितीन पवार, आ. राजू नवघरे उपस्थित होते.